,

शिवाजी कोण होता?

“शिवाजी कोण होता?” गोविंद पानसरे यांच्या द्वारे लिखित पुस्तकावर लघुनिबंध/सारांश लेखन… “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या  उडवीन राई राई एवढ्या…” कवीने एका मावळ्यांचे उद्गार धान्यांनी भरलेल्या शेतातून जाताना घोडेस्वारासोबत बंड करून उठतो, असे वर्णन केले आहे आणि तो शेतातून जाणारा घोडेस्वार दुसरा कोणी नसून खुद्द राजे आहेत(त्याने महाराजांना पहिलच नव्हतं!). ही सामर्थता ज्याच्या…

By

min read

shivaji kon hota pdf cover

“शिवाजी कोण होता?” गोविंद पानसरे यांच्या द्वारे लिखित पुस्तकावर लघुनिबंध/सारांश लेखन…

“खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या

 उडवीन राई राई एवढ्या…”

कवीने एका मावळ्यांचे उद्गार धान्यांनी भरलेल्या शेतातून जाताना घोडेस्वारासोबत बंड करून उठतो, असे वर्णन केले आहे आणि तो शेतातून जाणारा घोडेस्वार दुसरा कोणी नसून खुद्द राजे आहेत(त्याने महाराजांना पहिलच नव्हतं!). ही सामर्थता ज्याच्या मावळ्यात असू शकते, त्यांचा राजा कसा असू शकेल? पण मध्यंतरी त्यांचा इतिहासाचा विपर्यास करण्यात आला. महाराजाची यशोगाथा स्वतःच्या स्वार्थापायी मराठी मातीपासून लपवून ठेवण्यात आली होती. पुढे महात्मा फुल्यांनी रायगडावर महाराजांची मूर्ती शोधून काढली आणि त्याच्यानंतर त्यांच्या पोवाड्याद्वारे राजे महाराष्ट्राला माहीत झाले. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं एक थोर रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. ज्यांच्या कर्तुत्वाचे दाखले जगभर दिले जातात त्या शिवाजी महाराजांना काही लोकं मात्र केवळ राजकारणासाठी वापरत होते (आजही वापरत आहेत) आणि  समाजात सत्य सामोरे येऊ दिलंच नाही. मोठ्या प्रमाणावर सत्य वाटेल अश्या असत्य गोष्टीची मांडणी साहित्याच्या माध्यमातून करण्यात आली. त्याला प्रतिउत्तर म्हणून १९८८ च्या काळात गोविंद पानसरेंनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाची पुराव्यासह मांडणी केली. ती तत्कालीन काळाची गरज होती आणि आजही आहे. याची शाश्वती आज आपण लिहत असलेल्या सारांशातून होतेय कारण आजही महाराज जनसामान्यांपर्यंत पोहोचले नाहीत. प्रस्तुत पुस्तकाचे विविध भाषांतर आणि त्याच्या खपलेल्या प्रती ह्या विषयाची गहनता स्पष्ट करतात.

आजच्या या एकविसाव्या शतकात देखील जाती, धर्म, लिंग, वंशावरून भेदभाव होतो.  त्या काळात महाराजसोबतही भेदभाव झाला. पहिल्यांदा तर त्यांना शूद्र जातीचे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यापासून ब्राह्मणांनी विरोध केला. पुढे पहिल्या राज्याभिषेकामध्ये गागाभट्टाने काही चुका केल्या म्हणून निश्चलपुरी गोसावीने पुन्हा राज्याभिषेक केला. एका राजास दोनदा राज्याभिषेकाला भाग पाडून देवाला आणि ब्राह्मण पुरोहितला संतुष्ट करूनही या राज्याभिषेकानंतर राजे फक्त सहा वर्षे जगले. त्याकाळी शिवाजी महाराजांना शुद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यांत महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. चातुर्वणर्य रचनेचा, वर्णवर्चस्वाचा त्रास शिवाजीलासुध्दा झाला. तो धर्म मानीत असल्याने त्याने मार्ग काढला. राज्याभिषेक करवून घ्यावा लागला धर्माची मान्यता घ्यावी लागली. एवढेच नाही तर स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे ९६ कुलीचे मराठे सरदारही शिवाजीचा ‘राजा’ म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. जावळीच्या मोऱ्याची गोष्ट सर्वानाच माहीत आहे! या सर्व बाबीचा अर्थ म्हणजे सर्वच ब्राह्मण वा ९६ कुळी मराठे त्याचा विरोधात करत होते असे नव्हे. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. मोरोपंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते. ते एक मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होते. शिवाजीची आग्र्याहुन सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासात नोंद केलेली आहे. याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव मोहिते, येसाजी कंक, शिवा काशीद अशा हजारो मराठी मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीस प्राण त्यागले.

शिवाजी हिन्दू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभुमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. पण प्रत्येक गोष्टीला हिंदू-हिंदू जोडून शिवाजीराजांना फक्त हिंदुसाठीच मर्यादित ठेवणे चूक आहे. रयतेच्या स्वराज्य निर्मितीमध्ये सर्व जातीचे-धर्माचे लोक होते. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हे आपण आज उगाच म्हणत नाही. त्यामागे जिवा महाला, शिवा न्ह्यावी अशा अनेक मावळ्यांच्या प्राणाची आहुती आहे. महाराजांचा किल्लेदार हा महार, हेरप्रमुख बहिर्जी हा रामोशी, आरमार सरदार हा मायनाक भंडारी होता तर आरमार प्रमुख दौलतखान, तोफखाना प्रमुख इब्राहिम होता. राजाने आपल्या जनतेला आणि स्वराज्य हिताला प्रथम प्राधान्य दिलं म्हणून जात-धर्मापुढेही जाऊन अंतरजातियच नव्हे तर अंतरधर्मीय विवाहास मान्यता दिली. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता पण त्याची धर्मश्रध्दा आंधळी नव्हती. शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले नाही तर त्यांच्याशी सोयरसंबंध जोडले. राज्य कारभारामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी जमीन मोजली, वतने देण्यास विरोध केला आणि वसूल ठरवून दिला. एवढेच नाही तर दुष्काळ पडल्यास नवीन पिकास बीज दिले व वसुलीही माफ केली. ‘जय भवानी,जय शिवाजी’ म्हणून शिवाजी महाराज समजत नाही; अश्या कणखर भाषेत ललेखकाने वास्तवाची जाणीव करून दिली आहे. ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणून जयंती साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी लोकं वर्गणी गोळा करतात पण या वर्गणीची पारदर्शकता कितपत असते वा असायला पाहिजे, यावर कोणाचाही नियंत्रण नसतं. ज्या राजाच्या काळात कधी भ्रष्टाचाराला वाव मिळाला नाही त्या राजाच्या नावावर भ्रष्टाचार होत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे.

लेखकाने वाचकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. उदा. क्षत्रिय कुलवंतस? कुलवाडी भूषण? भवानीची तलवार कुठून आली? इ. त्यांनी फक्त प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर त्यांचं निवारण देखील केलंय. याचबरोबर त्यांनी ‘शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता, तो हिंदू धर्मरक्षक होता, गोब्राह्मण प्रतिपालक होता, शिवाजी धर्मासाठी लढला म्हणूनच तो यशस्वी झाला वा भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणकरताच दिली, शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी झाला नसता’ इ.लेखकाने बाबीना मोडून काढल्यात. जर राजे हे हिंदू धर्मरक्षक होते म्हणून ते यशस्वी झाले असे गृहीत धरले तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाही? विशेष म्हणजे इतर दोन्ही तर निर्विवादपणे ‘उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू’ होते. महाराजांच्या क्षत्रियत्वासंबंधी काहींना तरी शंका होती. स्वराज्य हे हिंदू राज्य व्हावे अशी ‘श्रींची’ इच्छा असे म्हणावे तर मग ‘श्रींना’ राणा प्रतापच्या अन् पृथ्वीराज चौहानाच्या प्रदेशातही ‘हिंदू राष्ट्र व्हावे’ असे का वाटले नाही. पानसरेंनी प्रस्तुत पुस्तकामध्ये संदर्भासह युक्तिवाद मांडलाय, हे या लेखनाचं वेगळेपण.

आणखी एक खासियत म्हणजे या पुस्तकामध्ये लिहलेल्या अनेक गोष्टींचा प्रत्यय आजही आपल्याला समाजामध्ये अनुभवायला मिळतय. उदा.सरंजामशाहीच्या काळात, पुस्तक लिहिलेल्या काळात आणि आज पुस्तक लिहून तीन दशक उलटून गेलीत तरीही लेखकाने मांडलेल्या स्त्रीप्रश्नाचं समाधान अजून अनुत्तरित आहेत. त्याकाळी रांझ्याच्या पाटलाने एक शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला उचलून नेलं आणि भोगली. राजाला ही गोष्ट माहीत होताच त्या पाटलाचे हात-पाय तोडले. १६७८ मध्ये सकुजी गायकवाड या सेनापतीनं २७ दिवस किल्ला लढलेल्या शत्रू सावित्रीबाईला सूड भावनेनं पाहिलं. त्याला त्याच किल्ल्यावर महाराजांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुसलमान शत्रूची तरणीताठी अन् देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अन् ‘आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते’ असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्यसंपन्नता आणि सोंदर्यसंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. मग वाचकासमोर हा प्रश्न उभा राहतो की सरंजामशाहीच्या काळातील न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था आणि लोकहीतवादी स्वराज्यनिर्मिती ही आजच्या लोकतंत्रातून श्रेष्ठ का?

हल्ली शिवाजी म्हणजे कोणी ‘शिवाचा’ अवतार तर कुणी ‘विष्णूचा’ अशा अनेक गोष्टी पसरवण्यात आल्यात. पण कदाचित याचा विपर्यास होऊन एक सर्वसामान्य व्यक्ती कधी अवघड कामास पाऊल उचलणार नाही. त्याच करण म्हणजे, काही थोर काम करायचे असेल तर त्यासाठी देवाचा अवतार असायला हवं! आणि महाराजांना देवाच अवतार सांगून आपण पुढच्या पिढीला श्रद्धा-अंधश्रद्धा मध्ये ढकलत आहोत. महात्मा फुले इतिहाससंशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक म्हणून त्यांनी शिवाजीस ‘कुळवाडी भूषण वा शूद्राचा पुत्र’’ पोवाड्यात असे म्हटले असेल म्हणून त्यांचा पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. रामदासाने शिवाजीला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडाक्याचे वाद आहेत.

या गोष्टीला ज्याप्रमाणे समाजातील काही स्वार्थी प्रवृत्ती कारणीभूत आहेत, त्याचप्रमाणे समाजातील एक नागरिक म्हणून आपण देखील कारणीभूत आहोत. महाराजांवर उगाच वाद उकरून कोणीतरी उभा राहतो आणि आपण देखील त्यात आपलं ‘योगदान’ देऊन त्या वादाचं महत्त्व वाढवतो, त्याला प्रसिद्धी देतो. त्याचा परिणाम असा होतो की सत्तापिपासू लोक त्याचं राजकारण करतात. मुळात काहींनी इतिहास खरा मांडला तर काहींनी आपल्या सोयीनुसार इतिहासाची मांडणी केली. इतिहास प्रत्येक वेळेस खरं बोलेल वा प्रत्येक वेळेस खोटंच बोलेल असे मत मांडणे निरर्थक आहे. कधी एखाद्या घटनेला कोणी तेलं-मीठ लावून सांगू शकतो, आपल्यासमोर काल्पनिक घटनेला जिवंत रूप देऊ शकतो; ही त्या इतिहासकाराची शब्दाची ताकत म्हणावी लागेन, इतिहास नव्हे. भावनेच्या बळावर इतिहास टिकू शकत नाही. त्याला शास्त्रशुध्द पुराव्याची, संदर्भाची गरज असते. म्हणून महाराजांचं खरा आणि पुराव्यानिशी मांडलेल्या इतिहासाला समोर आणावा लागेल. त्याचबरोबर सोयीस्कर इतिहासापासून समाजाला वाचवावे लागेल आणि इतिहासाची विपर्यास पुनरौत्ती थांबवावी लागेल. शिवाजीराजे घोडीवर बसायचे की घोड्यावर? अशा प्रश्नामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा महाराजांच्या इतिहासातून चांगल्या आवश्यक गोष्टीचा संदर्भ घेऊन आजच्या समाजामधल्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करायला हवं. यासाठी आजच्या आणि पुढच्या पिढीने कोणत्याही महात्म्याला डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेणं अधिक योग्य ठरेल!

राजेश राठोड

टीप: पुस्तकाची pdf इंटरनेट वर free मध्ये उपलब्ध आहे…              

28 April 2020

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.