सोशल मीडिया सोसतोय का?

मानवाच्या उत्क्रांतीबरोबर प्रसार माध्यमाचा वापर आणि विकास होत गेला. प्राचीन काळात माणूस आपला संदेश दूताद्वारे व कबुतराद्वारे पाठवत असे. सोळाव्या शतकात पाश्चात्य देशांनी विज्ञानात अफाट झपाटी मारायला सुरुवात केली. मग पुढच्या काळात टेलिग्रामचा शोध लागला, नंतर टेलिफोन आणि हल्ली टीव्ही, संगणक, मोबाईल, इंटरनेट यांच्या शोधामुळे सर्व विश्व एक मुठीत असल्याचा आज आपल्याला भास होतो. सोशल…

By

min read

मानवाच्या उत्क्रांतीबरोबर प्रसार माध्यमाचा वापर आणि विकास होत गेला. प्राचीन काळात माणूस आपला संदेश दूताद्वारे व कबुतराद्वारे पाठवत असे. सोळाव्या शतकात पाश्चात्य देशांनी विज्ञानात अफाट झपाटी मारायला सुरुवात केली. मग पुढच्या काळात टेलिग्रामचा शोध लागला, नंतर टेलिफोन आणि हल्ली टीव्ही, संगणक, मोबाईल, इंटरनेट यांच्या शोधामुळे सर्व विश्व एक मुठीत असल्याचा आज आपल्याला भास होतो. सोशल मीडियामुळे आपण देश-प्रदेशाच्या पलीकडे जाऊन लाखो किमी. अंतरावर देखील संभाषण साधू शकतो, आपल्याला हव्या असलेल्या बातम्या काही सेकंदात प्राप्त करू शकतो. एवढचं नव्हे तर आपण अमेरिकेत शिकवत असलेल्या गोष्टी घरबसल्या अभ्यासू शकतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही वेळातच ‘रक्त पुरवठा’ होतो. चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या  ‘करोना’ विषाणूबद्दल देशाच्या विविध कोपऱ्यात माहिती पोहचली. या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाने मानवाला दिलेली एक सुवर्ण-शिदोरी होय.

आपले वयक्तिक विचार लोकांसमोर मांडण्यासाठी हल्ली लोक फेसबुकचा मोठया प्रमाणावर वापर करत आहेत. कोणी लोकांना चांगली माहिती देतंय तर कोणी माहितीच्या आधारे लोकांमध्ये भांडण पेटवतय. मिर्झापुर या मालिकेत दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या बंदुकांचा व्यापार वाढवायचा असेल तर लोकांना त्याची गरज भासेल अशी अस्थिरता निर्माण करणं गरजेचं ठरतं. त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजमध्ये राजकारण चालू ठेवायचं असेल तर ‘भक्त’ प्रजाती निर्माण कराव्या लागतील हे सगळेच नेते समजतात. यामध्ये सोशल मीडिया हे त्या लोकांसाठी सगळ्यात चांगलं माध्यम आहे. विडिओ, फोटो आणि लेखाच्या मदतीने लोकांपर्यंत जाती-धर्माचे डोस पोहचले की गांडुळाप्रमाणे लोकं सळसळ करायला लागतात. बौद्धिक पागलपंतीच्या यादीत ‘व्हाट्सएप युनिव्हर्सिटी’ने देशात पहिला क्रमांक प्राप्त केल्याचं अनेक समीक्षकांचे मत आहेत.

सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतामध्ये आयटी इंडस्ट्री भराट्याने वाढत आहे. वैश्विक स्तरावरती अनेक देशामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची स्पर्धा चालू झालीय. भारतामध्ये जागतिक स्पर्धेबद्दल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्राचे फायदे आणि तोटे आहेतच परंतु जागतिक पातळीवर पुढच्या २५-३० वर्षांत अर्थवव्यवस्थेला टिकवायचा असेल तर भारतातल्या शिक्षित बेरोजगारापैकी ज्यांना सोशल मीडिया हाताळता येते त्यांना या क्षेत्रामध्ये आता गुंतवण अत्यंत गरजेचं आहे. नाण्याला हेड आणि टेल या दोन बाजू असतात. पैंजमध्ये हेड लावल्यावर आपण जिंकू की नाही हे टॉस खाली पडल्यांनातरच समजेल. भविष्यात आपण सगळ्यांच्या पुढे जरी जाऊ शकलो नाही तरी कमीतकमी आपण आपलं स्थान जागतिक पातळीवर नोंदवुयात.

प्रसार माध्यमांना लोकतंत्राचा चौथा मूलभूत पाया मानला जातो. सरकार आणि जनता यांच्यामधील संभाषण हे प्रसार माध्यमाद्वारे आणि जनतेने निवडलेल्या प्रतिनिधीद्वारे होत असतो. सरकारी कामकाजामध्ये चेक्स अँड बॅलन्स(समतोल) असणं हे लोकतंत्रासाठी महत्वाचं ठरत तर त्यासाठी ‘स्वतंत्र’ सोशल मीडिया हे अंगभूत घटक आहे. २०१८ मध्ये रिपोर्टर्स सॅन्स फ्रँटीअर्स या पॅरिसमधील माहितीच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या संस्थेने १८० देशाचा अभ्यास केला ज्यामध्ये जागतिक प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा १३८ वा क्रमांक होता. या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केल्यास भारताला पाकिस्तानाइतकेच म्हणजे ४३.२४ गुण होते.

भारताला समाज प्रबोधनाची चळवळ लाभली. त्यात पुरोगामी विचारांची ज्योत घेऊन जाणारे लोक आजही समाजात वावरत आहेत(आणि वावरतदेखील होते). विविध स्तरावरचे विविध लोकं आपापल्या परीने समाजबांधणीमध्ये कार्यरत असतात. एकीकडे कुलबर्गी, गौरी लंकेश आणि याच पंगतीमध्ये बसणाऱ्या इतर पत्रकारांची हत्त्या केली जाते… दुसरीकडे निरपेक्ष न्यायलायचा संविधानी तराजू गंजून गेलाय. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्टने(सीपीजे) याने सूक्ष्म चौकशी करून जगात १९९२ पासून मारल्या गेलेल्या १३५० पत्रकारापैकी ५० भारतीय पत्रकार आहेत. अनेक पत्रकार ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहचण्याचा काम करत होते. यापैकी ३५ जण हे ‘बातमी किंवा भाष्य केल्याने आगर केल्यापासून रोखण्यासाठी’ मारले गेले. सीपीजेच्या अहवालानुसार जातीयवादी राजकारण व सामाजिक ध्रुवीकरणामुळे भारतातील परिस्थिती अधिक बनत असल्याचा संकेत देतो.

सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचे खाते उघडताना त्या माध्यमाच्या टर्म्स अँड कंडिशन(अटी आणि गोपियनियता) न वाचता खाते उघडतो. वापरकर्त्याने दिलेले ई-मेल, पासवर्ड, त्याच्या आवडी-निवडी, आचार-विचार यांचा वापर त्या विशिष्ट व्यक्तीला हाताळण्यासाठी वापरतात तर दुसरीकडे हीच गोष्ट सायबर गुन्हेगारीला प्रोत्साहित करते. तिसरे विश्वयुद्ध हे सोशल मीडियाने साठवून ठेवलेल्या माहितीमुळे होऊ शकतो असे विविध समीक्षकांचे मत आहे. 

भारतामध्ये फक्त २०१५ साली ११,५९२ सायबर गुन्ह्याची नोंदणी झाली. यामध्ये विशेषतः १५ ते २९ वयोगटातील युवापिढी आहारी गेलीय. एडवर्ड स्नोवडेन या अमेरिकन पत्रकाराच्या जीवनावर २०१६ साली हॉलिवूडमध्ये चित्रपट निघाला. त्या चित्रपटामध्ये अमेरिका सोशल मीडियाच्या जोरावर कशाप्रकारे जगावर स्वतःच वर्चस्व गाजवतो वा तेथील नागरिकांना स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षा का हवीय याचं ज्वलंत चित्रण केलंय.

सौदी अरेबियाच्या एक कंपनीने अनेक देशांना एक व्हाट्सएप स्पायवेर(व्हायरस) विकला, ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल वर पूर्णपणे ताबा मिळवू शकतो. जर मला दिल्लीमध्ये बसून भारताच्या कोणत्याही कानोकोपऱ्यात एखाद्या व्हाट्सएप वापरकर्त्याच्या मोबाईल मध्ये जे चालू आहे वा त्याच्या मोबाईल मध्ये कायकाय माहिती आहे हे बघणं, कोणाला कॉल करणं, वाटेल त्या वेळी फोटो-व्हीडीओ-ऑडिओ रेकॉर्डिंग करणं इ. गोष्टी शक्य झाल्यात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात याचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यावेळी अनेक लोकांवरती नियंत्रण ठेवण्यात आले, असे सौदी अरेबियाच्या कंपनीने अमेरिकेत भरलेल्या एका खटल्यात सांगितले. मग लोकांनी व्हाट्सएप वापरावे की नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मीडियाचे चांगले आणि वाईट परिणाम आहेतच. आपण घोड्याला पाणी पिण्यासाठी घेऊन जाऊ शकतोत परंतु पाणी प्यायचं की नाही हे त्यालाच ठरवावं लागतं. अश्याच प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान लोकांना मीडिया देऊ शकतो पण त्याचा वापर कशाप्रकारे करायचं हे वापरकर्त्यालाच ठरवावं लागेल. 

वाढती जनसंख्या, प्रदूषण, महागाई, भांडवलशाही, चंगळवादामुळे माणूस दिवशें दिवस एकटा पडत चालला आहे. फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, टिकटॉक, ट्वीटर अश्या अनेक ठिकाणी ‘सर्च अल्गोरिदम’चा वापर करुन व्यक्तीच्या आवडी-निवडीनुसार पोस्ट दाखवल्या जातात. याच्या परिणामस्वरूप तरुण आभासी दुनियेत फसतात. आई.एस.आई.एस. सारख्या दहशतवादी संगठनानी शेकडो तरुणांचे ब्रेनवॉश केलेत. हे ‘आधुनिक गुलाम’ उद्या एखादे मनोरुग्ण बनून वर्तमानपत्रासाठी ‘आत्महत्येच्या’ हेडलाईल बनतात. पिसिंग सारख्या पद्धतीचा वापर करून अनेक हॅकर सायबर गुन्ह्याच्या यादीत आपली नोंदणी करतात. आज दारुप्रमाणे लोक मोबाईल-मीडियाच्या आहारी गेलेत. यामध्ये फक्त वापरकर्त्याचाच दोष नाहीये. मुळात हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यामधेच दोष आहेत. त्यांनी जाणूनबुजून या तंत्रज्ञानामध्ये थोडी पोकळी ठेवलेली आहे आणि प्रत्येक वापरकर्ता तो आपल्यापरीने ती पोकळ भरून काढण्याचा प्रयत्न करतो. उदा. युसी ब्राउझर वर अनावश्यक गोष्टींच्या जाहिरातीचा बाजार, एका टॅब वर फेसबुक चालू असेल तर ते इतर टॅब वरच्या माहितीला गोळा करू शकने, युट्युब वर आपण सर्च केलेल्या गोष्टीचं परत परत येणं, आपण इन्स्टाग्रामवर आपण पाठवलेले मॅसेज डिलिट न करता नाहीसे करणे वा टेलिग्रामवर ऑफिशिअल कंट्रोल न करता येन. विशेष म्हणजे वर्तमानात सोशल मीडियावर माहितीचा गाभा कमी आणि जाहिराती इतक्या वाढवल्यात की वापरकर्त्याना पागलखाण्यात भरती करावे लागेल. (पण पब्जी खेळाडू आणि टिकटोक किंग-क्वीनपेक्षा त्यांची संख्या कमीच आहे!)

या सर्व गोष्टीचा विचार करता ‘सोशल मीडिया सोसतोय का?’ हा प्रश्न एकविसाव्या शतकाच्या युधिष्ठिराला विचारलेल्या यक्षप्रश्नपैकी एक असेल व त्याचे उत्तर आपापल्या परीने रेने देसकार्ट या पश्चिमात्य विचारवंताच्या भाषेत ‘आय थिंक देअरफॉर ऍम’ (मला वाटतंय म्हणून मी तसा) होय.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.